। मुरुड । वार्ताहर ।
ज्येष्ठ नागरिक संघ हे चालते बोलते व्यासपीठ असते. वयोवृद्ध लोकांचे जीवन शांततामय आणि निरोगी असले पाहिजे. या वयात ताण तणाव सहन होत नाही समाज घटकांकडून आपुलकीची अपेक्षा असते. ज्येष्ठ नागरिकांनी उतारवयात सुरक्षितते विषयी जागृत रहावे असे आवाहन मुरुडचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक तथा मुरुड तालुका सेवा निवृत्त संघटनेचे अध्यक्ष नयन कर्णिक, उपाध्यक्ष शकील कडू, बाळकृष्ण कासार, प्रमोद मसाल, रमेश कवळे, नैनिता कर्णिक, वैशाली कासार, अनघा चौलकर, प्रा. एम. एस. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठाशी संवाद साधताना झावरे म्हणाले की, अलिकडे संगणकाद्वारे सायबरचे गुन्हे वाढू लागले आहेत. तेंव्हा कुठल्याही अनोळखी व्यक्तीला दूरध्वनीवर संभाषण करताना कुठलीही जास्तीची माहिती देऊ नये असे सूचित केले. यावेळी बाळकृष्ण कासार यांनी शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच धुमस्टाईल दुचाकी स्वार, भाजी मार्केट मधील वाहतुक कोंडी व इतर समस्यांचा उहापोह केला. शकील कडु, नयन कार्णिक, रमेश कवळे, प्रमोद मसाल आदींनी चर्चेत सहभाग घेतला.