हेटवणे पुल चोरीप्रकरणी गंभीर विसंगती

अधिकारी-ठेकेदार संगनमतावर प्रश्नचिन्ह

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्पात पुलांच्या साहित्याच्या कथित चोरीप्रकरणी गंभीर विसंगती समोर येत असून, या प्रकरणात केवळ चोरी नव्हे तर मोठ्या आर्थिक अपहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. कनिष्ठ अभियंता अल्पेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती आणि पोलिसांना दिलेली माहिती यात मोठा फरक आढळून आल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.

अल्पेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 10 पुलांचे साहित्य चोरीस गेल्याचे सांगण्यात आले होते; परंतु, पोलिसांकडे दिलेल्या अहवालात हा आकडा थेट 13 पुलांपर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे, या 13 पैकी केवळ 3 पुलांच्या साहित्याबाबतच ठोस माहिती उपलब्ध आहे. उर्वरित साहित्य कुठे गेले, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. दरम्यान, कालव्यामधून पाईपलाईन टाकण्याचे काम आर. के. माधानी अँड कंपनी, सेनापती बापट नगर यांना देण्यात आले होते. या कंपनीला 31 डिसेंबर 2025 आणि 13 जानेवारी 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्रांनुसार, पाईपलाईन टाकण्यास अडथळा ठरणारे पूल काढण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, पूल काढल्याशिवाय पाईपलाईन टाकणे शक्य नसताना हे साहित्य नेमके कुठे गेले, याचे उत्तर आजतागायत मिळालेले नाही.

याच पार्श्वभूमीवर दि.20 एप्रिल रोजी हेटवणे मध्यम प्रकल्प सहाय्यक अभियंता (श्रेणी-1) यांनी संबंधित कंपनीला पत्र देत, काढण्यात आलेले साहित्य कुठे ठेवले याचा तपशील मागवला आहे. तरीही अद्याप यावर संमाधानकारक उत्तर मिळालेले नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी वारंवार तगादा लावूनही हेटवणे मध्यम प्रकल्प प्रशासनाकडून सविस्तर तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय बळावत आहे.

एका पुलाची साधारणतः किंमत 4 ते 5 लाख रुपये असल्याचा अंदाज असून, 13 पुलांचे साहित्य गायब झाल्याने लाखो रुपयांचा अपहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रम नवरखेडे हे करत आहेत. येणाऱ्या काळामध्ये साहित्याची चोरी की अपहार? हे समोर आल्या शिवाय राहणार नाही.

Exit mobile version