बामणडोंगरीत 43 इमारतींना पाण्याचा गंभीर तुटवडा

हंडा मोर्च्याने सिडको प्रशासनाला जाग

| रेवदंडा | प्रतिनिधी |

उलवेतील बामणडोंगरी सिडको वसाहतीमधील अनंता टॉवर गृहप्रकल्पातील 43 इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे पाच हजारांहून अधिक कुटुंबांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. घराचा ताबा मिळून वर्ष उलटूनही नियमित पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी सिडकोच्या उलवे कार्यालयावर हंडा मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले.

सिडकोच्या नियोजनातील त्रुटी आणि देखभालीतील दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सुरुवातीला पाणीपुरवठा सुरळीत होता; मात्र ऑगस्ट 2025 पासून टंचाई तीव्र झाली. सिडकोने प्रकल्पासाठी सहा पाणी क्लस्टर तयार केले असले तरी एका क्लस्टरला पाणी मिळते, तर दुसऱ्या क्लस्टरमध्ये दोन-दोन दिवस पाणी येत नसल्याची स्थिती आहे.

या टंचाईमुळे रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. महिलांचा मोठा सहभाग असलेल्या हंडा मोर्च्यात “सिडकोची आश्वासने फक्त कागदावरच!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मोर्च्यानंतर सिडको अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत काही आश्वासने देण्यात आली. त्यानुसार, रोजच्या पाणीपुरवठ्यावर देखरेख ठेवणे, बिघाड झाल्यास तातडीने टँकरची व्यवस्था करणे, फेस-1 साठी नवी जलवाहिनी 20 एप्रिलपर्यंत पूर्ण करणे, टर्शिअरी ट्रीटमेंट () प्लांट 30 एप्रिलपर्यंत कार्यान्वित करणे आणि पाण्याची गुणवत्ता तपासणी 15 मे 2026 पर्यंत पूर्ण करणे, अशी हमी देण्यात आली. मात्र, अशीच आश्वासने यापूर्वीही देण्यात आल्याने रहिवाशांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे.

रहिवाशांनी सिडकोच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, प्रकल्प उभारताना पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले नव्हते का, निधीचा गैरवापर झाला का, अशी शंका व्यक्त केली. तसेच सिडको ही शासनाच्या महसूल विभागांतर्गत संस्था असतानाही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. लाखो रुपयांना घरे विकूनही मूलभूत सुविधा न पुरविणे हा रहिवाशांवरील अन्याय असून, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

Exit mobile version