महाडमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण

| महाड | प्रतिनिधी |

विद्येचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी क्लासच्या शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा संतापजनक प्रकार केला आहे. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे वेळोवेळी लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन बालक हा महाड येथील एका खासगी क्लासमध्ये दहावीच्या शिक्षणासाठी जात होता. जून 2024 ते मार्च 2025 या कालावधीत आरोपी शिक्षकाने क्लासच्या दरम्यान पीडित बालकासोबत अश्लील कृत्ये केली. एवढेच नव्हे तर, सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या दरम्यान आरोपीने आपल्या क्रूरतेची सीमा ओलांडली. तक्रारीनुसार, आरोपीने शिकवणीच्या वेळी पीडित बालकाला क्लासच्या वरच्या मजल्यावर असलेल्या स्वतःच्या बेडरूममध्ये नेले. तिथे त्याला जबरदस्तीने बेडवर झोपवून, त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत अनैसर्गिक आणि अश्लील कृत्ये केली. तसेच वेळोवेळी विद्यार्थ्याला मिठी मारून विचित्र पद्धतीने स्पर्श करत त्याचे लैंगिक शोषण केले.

सततच्या या छळाला कंटाळून अखेर याप्रकरणी फिर्याद देण्यात आली. महाड शहर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुद्ध गुन्हा गुन्हा नोंदवला आहे. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वालकोळी हे करत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आपल्या पाल्यांना खासगी शिकवणीला पाठवताना सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version