| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जतच्या पाली सायडोंगर परिसरातील टोरंट प्रकल्पाच्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. यादरम्यान, सायडोंगर जंगल वाचवण्यासाठी मुंबईतील शाहीर बादल यांनी पेज नदीपात्रात उतरून जल आंदोलन सुरू केले आहे. दि.29 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला सात दिवस झाले आहेत.
मुंबईतील भांडुप येथील रहिवासी असलेले शाहीर बादल गुडेकर हे अनेक आंदोलनात सहभागी असतात. ते दि.27 ऑक्टोबरपासून कर्जत येथे आहेत. येथील जंगलतोड रोखण्यासाठी त्यांनी ‘जल वाचवा, जंगल वाचवा, जीवन वाचवा’ अभियान अंतर्गत सह्यांची मोहीम हाती घेतली. मात्र, येथील जंगलतोड थांबत नसल्याने आणि टोरंट प्रकल्प रद्द होत नसल्याने शाहीर बादल यांनी पेज नदीच्या पाण्यात उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, ते दि.29 ऑक्टोबरपासून पेज नदीच्या पाण्यात उभे आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान तेथे येणारे पर्यावरणप्रेमी यांच्यासमोर डफ वाजवत गाणी गाऊन पाली सायडोंगर येथील जंगल वाचवण्याविषयी जनजागृती करत आहेत. दरम्यान, सतत पाण्यात राहिल्यामुळे त्यांच्या पायांची अवस्था गंभीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. हातात डफली आणि काठी घेऊन ते या पाण्यात उभे आहे. बादल यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. त्यांच्या आंदोलनामुळे पेज नदीपात्रातील जलआंदोलन आणि साई डोंगरातील वृक्षतोडीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या आंदोलनाला पाली गावातील ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव मदत करत आहेत.
शाहीर बादल यांचे पाण्यात आंदोलन
