| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शैलेश दिलिप खोत यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदर नियुक्तीचे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना दिले आहे.
शुक्रवारी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या शिवाजी पार्क येथील नवीन बंगल्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी स्वहस्ते हे नियुक्ती पत्र शैलेश खोत यांना दिले. मनसे पक्षाचे ध्येय, धोरणे व कार्य वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवाल व यामध्ये कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही. आपण आपल्या सहकार्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, असे वर्तन अपेक्षित आहे. सदरची नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून, पदाच्या कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल.मराठी बांधव , भगिनी व मातांना अभिमान वाटेल असे कार्य हातून घडण्याच्या शुभेच्छा या पत्रातून देण्यात आल्या आहेत.
शैलेश खोत यांनी मुरुड तालुका मनसे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले असून त्यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.या प्रसंगी अलिबाग येथील सिध्दू म्हात्रे यांची अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे कळते.