आ. बाळाराम पाटील यांनी मत
। पनवेल । प्रतिनिधी ।
राज्य आणि केंद्र सरकार शिक्षणाविषयी भयंकर उदासीन आहे. शैक्षणिक धोरणात इतक्या त्रुटी आहेत, की त्या दूर केल्याशिवाय भारतीय शिक्षणपद्धत शिस्तबद्धतेने रुजू शकणार नाही आणि त्यातून भारतीय कणा असलेला विद्यार्थी चेपला जातो, असे स्पष्ट करत या त्रुटी दूर करायच्या असतील तर शैक्षणिक धोरणाच्या भारतीय पॅटर्नची निश्चित दिशा ठरवून त्यासाठी मजबूत आर्थिक तरतूद करायलाच हवी, असे स्पष्ट मत कोकण पदवीधर मतदार संघाचे सर्वसमावेशक आ. बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले.
‘शिक्षण: काल, आज आणि उद्या’, या विषयावर राज्यातील मान्यवर शिक्षण तज्ज्ञ, विश्लेषक, चिकित्सक आणि विचारवंतांनी विविधांगी परामर्श घेतलेल्या लेखांनी सजलेला दै. निर्भीड लेखच्या 26 व्या दिवाळी विशेषांकाचा शानदार आणि नेत्रदीपक प्रकाशन सोहळा नवीन पनवेल येथील के. आ. बांठीया विद्यालयाच्या भव्य सभागृहात रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी जोत्स्नाताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आ. बाळाराम पाटील बोलत होते.
महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती अतिशय उत्कृष्ट आहेच. अभिमानास्पद आहे. आज इतर देशांच्या तुलनेत विचार करता राज्यातील विविध क्षेत्रातील तरुण शिक्षणामुळे प्रगतीच्या शिखरांना कवेत घेताना दिसत आहे. आपल्याच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील तरुण, तरुणी इथल्या शिक्षणाच्या बळावरच इतर देशांच्या व्यापाराचा, व्यवसायांचा डोलारा सांभाळत आहेत. अमेरिका असू द्या किंवा फ्रांस, जपान, रशियासारख्या प्रगत देशात भारतीय, महाराष्ट्रीय तरुण त्यांचे आणि त्या त्या देशाचे भवितव्य घडवत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारला तरीही अजिबात जाग येत नाही. शिक्षणावर खर्च करून आणखी प्रगती करण्यासाठी आर्थिक धोरण ठरवण्याची गरज अद्याप सरकारच्या लक्षात येत नाही किंवा त्यांना तशी जाणीव होत नाही हे दुर्दैव असल्याचे स्पष्ट मत बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले.ज्योत्स्नाताई शिंदे, प्रशांत पाटील, अमित ओझे, सिताराम मोहिते, अॅड. प्रथमेश सोमण आदींनी यावेळी समायोचित भाषणे केली.
व्यासपीठावर आ. बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जोत्स्ना शिंदे, उद्धव शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रशांत पाटील, केशव स्मृती पतपेढीचे अध्यक्ष अमित ओझे, भाजपा नेते भीमसेन माळी, शेकापचे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, शिंदे गटाचे महानगर प्रमुख अॅड. प्रथमेश सोमण, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी, उद्योजक सूरदास गोवारी, शेकापचे माजी नगरसेवक आणि जिल्हा चिटणीस गणेश कडू, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सिताराम मोहिते, कळंबोली सुधागड एज्युकेशनचे मुख्याध्यापक राजेंद्र पालवे, पनवेल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंकज भगत, बांठीया विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. माळी आणि कांतीलाल कडू, ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी रामदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.