| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील रायगड जिल्हा परिषद अधिकारी कै. गोपाळराव (आबा) पवार यांचे चिरंजीव शैलेश पवार यांनी माणगाव व महाड येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सुमारे 10 वर्षे नोकरीचा अनुभव घेतला आणि 2010 साली स्वतःचा उद्योग उभारण्याचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात साकार केले. घरात उद्योग-व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, अथक परिश्रम, संयम, चिकाटी आणि स्वतःचे ज्ञान यांच्या बळावर त्यांनी पुण्यात सिंहगड रोडजवळील नांदेड सिटी परिसरात थर्मोटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. ही उत्पादन क्षेत्रातील कंपनी स्थापन केली. सध्या ते या कंपनीचे संस्थापक व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असून, सातत्याने उद्योगाची प्रगती साधत आहेत. अवघ्या तीन ऑपरेटर्ससह सुरू केलेला हा उद्योग आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योगसमूह बनला असून, 100 हून अधिक जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून कंपनी टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्स मोटर्स, हनीवेल, श्नायडर इलेक्ट्रिक, पॉलीकॅब, बजाज इलेक्ट्रिकल्स यांसारख्या नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना असेंब्ली पार्ट्सचा सातत्याने पुरवठा करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा अवलंब करून कंपनीने उत्पादन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय ते आपल्या आई-वडिलांना, पत्नीला, ग्राहकांना आणि विश्वासू कर्मचाऱ्यांना देतात. गुणवत्ता, सचोटी आणि विश्वास हीच त्यांच्या यशाची खरी ओळख असून, शैलेश यांची उद्योग जगतातील प्रेरणादायी प्रवास हा खरा कौतुकास्पद व अभिमानास्पद असा असून, माणगावकरांसाठी त्यांची हि झेप भूषणावह आहे.







