शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे गौरवोद्गार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
1967 पासून शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठेने काम करताना पक्षवाढीसाठी शंकरराव म्हात्रे यांनी मोठे योगदान दिले आहे. चौदा गाव बचाव आंदोलनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वयाची 75 वर्षे पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांच्यातील कार्यकर्त्याची उमेद कायम आहे. राजकीय क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, ते आजही सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत, असे गौरवोद्गार शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी काढले.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे यांचा वाढदिवस सोहळा शनिवारी (दि.10) त्यांच्या धोकवडे येथील राहत्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देताना जयंत पाटील यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. जयंत पाटील म्हणाले की, शंकरराव म्हात्रे हे 1967 पासून शेतकरी कामगार पक्षाचे काम करीत आहेत. पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला चालना मिळाली. वयाची 75 वर्षे गाठत असतानाही आज त्यांच्याकडे सन्मानाने पाहिले जाते. त्यांच्यातील कार्यकर्त्याची उमेद आजही कायम आहे. आणीबाणीनंतर जिल्ह्यात आणि तालुक्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी शंकरराव म्हात्रे यांच्यावर सोपविण्यात आली होती. तालुक्यात पक्षाची धुरा खंबीरपणे सांभाळत त्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते ॲड. स्व. दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चौदा गाव बचाव आंदोलनाचे नेतृत्व शंकरराव म्हात्रे यांनी केले. या परिसरात जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते शंकरराव म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्याला शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, अशोक नाईक, ॲड. विजय पेढवी, संदीप गायकवाड, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, पंचायत समितीच्या माजी सदस्य स्नेहा म्हात्रे, माजी सरपंच सचिन म्हात्रे, जगन्नाथ पाटील, मज्जीद कुर, किहीमचे उपसरपंच मिलिंद पडवळ, नवगावचे उपसरपंच निखिल कवळे, नैना शिलधनकर, नयन नाखवा, योगेश गावंड, किसन गायकवाड, सुरेंद्र कटोर, विशाल शेट्टे, अरुख मनीयार यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि म्हात्रे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचा सोहळा उत्साहात पार पडला.
पक्षनिष्ठा, जनआंदोलनाचा प्रदीर्घ प्रवास!
शंकरराव म्हात्रे यांनी 1967 पासून शेतकरी कामगार पक्षासाठी निष्ठेने काम करत पक्षवाढीत मोलाचे योगदान दिले. आणीबाणीनंतर जिल्ह्यात आणि तालुक्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. पक्षाची तालुक्यातील धुरा हाती घेत त्यांनी कार्यकर्त्यांची बांधणी केली आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते ॲड. स्व. दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चौदा गाव बचाव आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले. या आंदोलनाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे म्हात्रे वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत असतानाही कार्यकर्त्याच्या त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांची पक्षनिष्ठा, संघर्षाची भूमिका आणि जनतेसाठी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी काढले.
