| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना नुकतंच पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती समोर आली होती. शरद पवार यांच्या कन्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली होती. मात्र, आता शरद पवारांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याचीदेखील माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. “बाबांच्या पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत. आपली काळजी, सदिच्छा आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहोत”, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सांगितलं आहे. याआधी बुधवारी सकाळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना पुण्याच्या रुग्णालयात डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली होती.
शरद पवार यांनी बारामतीपासून दुष्काळी भागाच्या पाहणीचा दौरा सुरु केला होता. ते सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये जावून दुष्काळी भागांना भेटी देणार होते. शरद पवार शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार होते. त्यांनी बारामतीत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला धाराशिवमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवारांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती. स्वत: सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत शरद पवारांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली होती. शरद पवारांनी खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली होती. रुबी हॉल रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम शरद पवारांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी 4 नोव्हेंबरला सकाळी त्यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्च मिळाला. पण त्यानंतर काही तासांनी त्यांना मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. तिथे त्यांच्या काही टेस्ट केल्या जाणार असल्याची माहिती आहे.





