जरांगेंच्या विचाराला सहकार्य करावे: शरद पवाार

। बीड । प्रतिनिधी ।

शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे असो, की आणखी कोणी पुढे येत असतील, तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. मागे जरांगे यांना विनंती केली की, महाराष्ट्रात कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मोदींच्या पक्षात देशाच्या ऐक्याचा विचार नसल्याने भाजपच्या आसपासही जाणार नाही.

लोकसभेच्या बीड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची सांगता शनिवारी शरद पवार यांच्या सभेने झाली. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, खासदार फौजिया खान, उमेदवार सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, उषा दराडे, साहेबराव दरेकर व गणेश वरेकर आदींची उपस्थिती होती.

सरकारला शेतकरी व आया-बहिणींची आस्था नाही, असा गंभीर आरोपही पवार यांनी केला. पंतप्रधानांकडून सर्वांना समान न्यायाची अपेक्षा आहे. मात्र, मोदींकडून हे होत नाही. पंतप्रधान मुस्लिमांबद्दल जाहीर बोलतात. देश एकसंध ठेवण्यासाठी त्यांना मदत होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. शेतमालाला किंमत नाही. पंजाब, हरियाना भागातील शेतकरी दिल्लीत बसले. हमीभाव मिळावा, अशी मागणी केली, पण यांनी जुमानले नाही. सरकार शेतकरीविरोधी असून त्यांना शेतकर्‍यांचा हिसका दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.

Exit mobile version