| नाशिक | वृत्तसंस्था |
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून नाशिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने 7 चॉपर, 1 कोयता आणि 1 गुप्ती असे घातक शस्त्र ताब्यात घेतली आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
15 ते 17 वयोगटातील ही मुले असून नववी आणि दहावीच्या इयत्तेत ते शिक्षण घेत आहेत. ही पाचही मुले नाशिकच्या दोन नामांकित शाळेतली आहेत. या मुलांच्या शाळेतील एक दहावीचा विद्यार्थी भूगोलचा शेवटचा पेपर आवरून एका मुलाला मारहाण करायला येणार होता आणि तो येताच त्याच्यावर हल्ला चढवण्याच्या तयारीत ही सर्व मुले होती. गुन्हे शाखा युनिट एकचे विलास चारोस्कर, नितीन जगताप आणि मुक्तार शेख यांना माहिती मिळाली होती. त्यांनी चिंचबन परिसरात सापळा रचला होता. ही शस्त्रे त्यांनी गुजरातच्या बडोद्याहून मागवली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या वादामागे प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.