गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत चुयेकर

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुरुवारी (दि.29) मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. महायुतीचे संचालक अनुपस्थित असताना समविचारी आघाडीच्या 13 संचालकांनी समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचा दावा केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गणपूर्तीअभावी निवड प्रक्रिया पुढे नेण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर समविचारी आघाडीच्या संचालकांनी स्वतंत्रपणे ही प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे 13 संचालकांचे संख्याबळ असल्याचा दावा करत ही निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेला विरोध करून बहुमताच्या जोरावर समांतर सभा घेण्यात आली. या सभेत आपली अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करत, आजपासून गोकुळचा अध्यक्ष म्हणून आपणच कामकाज पाहणार असल्याची घोषणा शशिकांत पाटील-चुयेकर यांनी केली. मात्र, या निवडीबाबत महायुतीचे संचालक काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशिकांत पाटील-चुयेकर म्हणाले की, “गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार अध्यक्षपदाची निवडणूक घेणे आवश्यक असते. त्यानुसार दि.29 ऑक्टोबरला निवड होणार होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रक्रिया सुरू केल्यानंतर आम्ही त्यांना आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सांगितले आणि आमच्या उमेदवाराची निवड करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी ती मान्य केली नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विरोध करत आम्ही स्वतंत्र सभा घेतली. या सभेत 13 संचालकांच्या उपस्थितीत माझी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.” असे ते म्हणाले.

Exit mobile version