| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे शहर व विभागातील बेरोजगार तरुण तरुणींना नोकरी व रोजगाराची संधी मिळावी या उदात्त हेतूने भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे खजिनदार व शिवराज्य संघटना प्रमुख अतुल म्हात्रे यांच्या वतीने नागोठण्यातील श्री शिवगणेश सभागृहात शनिवारी (दि.18) सकाळी 10.30 वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात 18 ते 35 वयोगटातील आणि शैक्षणिक पात्रता 10 वी ते पदवीधर, एम. कॉम, एम. एससी, एम. ए. आय टी आय, डिप्लोमा इंजिनिअरिंग, व अन्य शिक्षण असलेल्या तरुण तरुणींनी आपले शैक्षणिक कागदपत्र सोबत घेऊन येण्यास सांगण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून मेळाव्यात आलेल्या बेरोजगार युवक युवतींची मेळाव्यातच मुलाखत घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना तेथेच ऑफर लेटर/नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. या मेळाव्यामुळे नागोठणे विभागातील युवकांसाठी 100 टक्के नोकरीची सुवर्णसंधी लाभणार असल्याने या मेळाव्यास बेरोजगार युवकांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश तरुण तरुणींचा नोकरीचा शोध सुरू होतो. काहीजण नोकरी मिळविण्यात यशस्वी होतात तर अनेकांना बेरोजगार रहावे लागते. शेकापचे सरचिटणिस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण मतदार संघात सर्वत्र भव्य बेरोजगार मेळावे आयोजित करून तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. याचाच एक भाग असलेल्या नागोठण्यातील या भव्य रोजगार मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी बेरोजगार तरुण तरुणींनी मोबाईल क्रमांक 7710819681 यावर संपर्क साधून रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन तुकाराम खांडेकर यांनी केले आहे.







