शेतकरी कामगार पक्षातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

कासारभट येथील शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने शेतकरी कामगार पक्षातर्फे शुक्रवारी (दि.8) अपर तहसील कार्यालयावर माजी आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी तत्कालीन तलाठी आणि तत्कालीन मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि शेतकऱ्याचा सातबारा जीवंत करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि शेकापचे रायगड जिल्हा शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कासारभट येथील भोंडकर परिवारातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. साई येथील 108 गुंठे जमीन तत्कालीन तलाठी व तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी बनावट कागदपत्रे बनवून व बनावट सावकार उभे करून जमीन हडप केल्याचा या दोघांवर आरोप आहे. भोंडकर या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सातबाऱ्यावर पुन्हा भोंडकर कुटुंबियांची नावे लागण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अपर तहसीलदार यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी सभापती नारायण घरत, पालिका जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, तालुका चिटणीस पनवेल विधानसभा व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, तालुका चिटणीस राजेश केणी, काँग्रेस पालिका जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महापालिका महिला जिल्हाध्यक्ष हर्षला तांबोळी, शेकाप सहचिटणीस तेजस्विनी घरत, पुरोगामी जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील आणि अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version