जंतर-मंतरवरील आंदोलनाला शेकापचा पाठिंबा

अतुल म्हात्रेंनी दिल्लीत जाऊन दिले समर्थनपत्र; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला समर्थन

| चिरनेर | प्रतिनिधी |

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला भारतीय शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल नंदकुमार म्हात्रे यांनी थेट आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि पक्षाच्या वतीने नैतिक पाठिंब्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या घडामोडीमुळे महाराष्ट्रातून या आंदोलनाला मिळालेल्या राजकीय पाठिंब्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अतुल नंदकुमार म्हात्रे यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावेळी आंदोलनाला अधिकृत पाठिंबा दर्शविणारे पत्र सुपूर्द करण्यात आले. तसेच आंदोलनात सहभागी असलेले सोनम वांगचुक यांच्याप्रतीही ऐक्य व्यक्त करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि परीक्षा प्रक्रियेवरील जनविश्वास अबाधित राखण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांवर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी भूमिका शेकापने स्पष्ट केली.
अतुल म्हात्रे यांनी सांगितले की, भारतीय शेतकरी कामगार पक्ष संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय, पारदर्शकता आणि जनहित या मूल्यांशी कायम कटिबद्ध असून, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या प्रत्येक शांततापूर्ण आंदोलनाला पक्षाचा नैतिक पाठिंबा राहणार आहे.

यावेळी केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन लोकशाही संवादातून तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, असे आवाहनही पक्षाने केले. महाराष्ट्रातून या आंदोलनाला मिळालेल्या पाठिंब्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असल्याची माहिती ॲड. रोशन पाटील (मुंबई उच्च न्यायालय) यांनी दिली.

Exit mobile version