अलिबाग-रोहा रस्त्यासाठी शेकाप आक्रमक; पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पीडब्ल्यूडीवर धडक

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग रोहा रस्त्याचे ठेकेदार अग्रवाल कंपनी आगाऊ देण्यात आलेली रक्कम 18 कोटी रुपये घेऊन संपर्कक्षेत्राबाहेर असल्याचे वृत्त कृषीवलमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागात धडक दिली. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांना जाब विचारत गायब झालेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन त्याच्याकडून 18 कोटी वसूल करण्याची मागणी केली.

या शिष्टमंडळात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, माजी उपसभापती प्रकाश पाटील, युवा नेते सवाई पाटील, माजी उपसभापती अनिल गोमा पाटील, आंबेपूरच्या सरपंच सुमना पाटील, सिद्धनाथ पाटील, रेवसचे उपसरपंच दीपक पाटील, शेकाप आरोग्य सेवेचे रुपेश पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते.


यावेळी पंडित पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत अलिबाग रोहा रस्त्याचे काम कधी सुरु होणार याची विचारणा केली. पाऊस जाऊन दिवाळी गेली तरी अजून काम का सुरु करण्यात आले नाही याचा जाब विचारला. रस्त्याचे खड्डे देखील संबंधीत एजन्सी न करता तिसरीच कंपनी काम करत असल्याचे यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले. 18 कोटी घेऊन अग्रवाल कंपनीने काय काम केले ते स्पष्ट करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. 18 कोटी एवढी मोठी रक्कम घेऊन जर कंत्राटदाराजवळ संपर्क होत नसेल तर त्याच्याशी केवळ पत्रव्यवहार न करता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हा सर्व प्रकार सदर रस्त्याच्या कामाचे कंत्राट दुसर्‍या कंपनीच्या घशात घालण्यासाठी सुरु असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे सदर रस्त्याचे काम सुुरु करताना सुरुवातीला या रस्त्यावरील मोर्‍या आणि पुलाचे काम सर्वप्रथम करण्याची मागणी करण्यात आली. 10 दिवसात जर रस्त्याचे काम सुरु केले नाही तर अधिकार्‍यांना कार्यालयात बसून देणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

जनहित याचिका दाखल करणार
तीन वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम काही सुरु होत नाही. तर कंत्राटदार 18 कोटी रुपये घेऊन परागंदा झाला आहे. त्यामुळे सतत निवेदने देऊन, आंदोलने करुन काहीही फरक पडत नसल्याने आता या रस्त्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांनी सांगितले. तसेच या जनहित याचिकते कार्यकारी अभियंता यांच्यासह सर्व अधिकार्‍यांना प्रतिवादी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

अभियंत्यांचे धक्कादायक उत्तर
यावेळी शिष्टमंडळाने अलिबाग रोहा रस्त्यावर पॅचवर्क करण्यात आले आहे. ते कोणी केले याचे स्पष्टीकरण मागितले. त्यावर अभियंता राजिव डोंगरे यांनी आपल्याला माहित नाही असे धक्कादायक उत्तर दिले. त्यामुळे आश्‍चर्यचकित झालेल्या शेकाप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत डोंगरे यांना धारेवर धरले. त्यावर आपली चुक झाली असल्याचे डोेंगरे यांनी म्हणत दिलगीरी व्यक्त केली.

Exit mobile version