महिलांचा संताप अन् घोषणाबाजीतून निषेध
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा अपमान केल्याप्रकरणी शेकाप महिला कार्यकर्त्यांकडून अलिबाग तालुक्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे शेकापच्या महिला नेत्या आक्रमक झाल्या. तरुणांसाठी, महिलांसाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकर्यांच्या हक्कासाठी कायम लढणार्या चित्रलेखा पाटील यांचा अपमान सहन न झाल्यामुळे शेकापच्या महिला कार्यकर्त्यांच्या संतापाचा निषेध मोर्चात उद्रेक झाला.
शेकापच्या महिला युवा कार्यकर्त्यांनी पेझारी येथील निषेध मोर्चात राजा केणींसह सचिन धुमाळ यांच्यावर टीकास्त्र डागलं. त्या म्हणाल्या, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांचे वक्तव्य हे केवळ महिलांचे अपमान करणारे आहे. सध्या शिंदे गटाचे लोक बोलण्याचे तारतम्य पाळत नाही. यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी आम्हाला पोलीस किंवा कुणी काहीही शिक्षा किंवा कारवाई करू शकत नाही. या मस्तवालपणातून हे वक्तव्य होत आहे. शेतकरी आणि महिलांचा अपमान करणं हाच तुमचा अजेंडा आहे का?, अशी टीका भैरवी जाधव यांनी केली आहे.
शेकाप तालुका महिला आघाडीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी पेझारी नाका येथे राजा केणी व सचिन धुमाळ यांच्याविरोधात निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांना महिलांकडून निवेदन देण्यात आले. तसेच महिलांचा अनादर केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
समाज व्यसनाच्या विळख्यात सापडला आहे. त्याविरोधात महिलांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे वक्तव्य चित्रलेखा पाटील यांनी मेळाव्यात केले. या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊन शिंदे गटातील तालुक्यातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. चित्रलेखा पाटील यांंचा अपमान केला. तसेच त्या कृत्याचा व्हीडीओ समाज माध्यमांवर पाठवून त्यांची बदनामी केली. याबाबत महिलांसह तरुणींनी संतप्त प्रतिक्रिया देत बदनामी करणार्यांविरोधात निषेध व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी राजा केणी आणि सचिन धुमाळ तसेच इतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले. या कृत्याच्या निषेधार्थ शेकाप तालुका महिला आघाडीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी पेझारी नाका येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी निषेधार्थ घोषणा करत राजा केणी आणि सचिन धुमाळ यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. नको लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री शिकवा तुमच्या कार्यकर्त्यांना, अशा घोषणा महिलांनी एकत्र येऊन दिल्या.
शिक्षण असूनदेखील तरुणाईला रोजगार नाही. परंतु, सत्ताधारी आपल्या फायद्यासाठी निवडणुकांपुरता तरुणाईचा वापर करतात. तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील गंभीर होत आहे. हा प्रश्न सोडविण्यास सत्ताधारी अपयशी ठरत आहेत. कोणेतेही राजकारण न करता केवळ समाजहितासाठी, तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेकाप काम करीत आहे. शेकापच्या महिला मेळाव्याने शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना आगामी निवडणुकीत अपयश येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ विरोधी भावना ठेवून शिंदे गटातील काही मंडळी कायदा व सुव्यवस्था बिघविडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरुणांची दिशाभूल करणार्यांविरोधात चित्रलेखा पाटील यांनी आवाज उठविल्यानंतर त्यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. ही बाब निंदनीय असल्याची प्रतिक्रिया महिलांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पेझारी नाका ते पेझारी चेक पोस्टपर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष रोशनी मोकल, नागेश्वरी हेमाडे, भैरवी जाधव, तन्वी पाटील, संध्या पाटील, श्रेया केळकर, मनीषा रेळकर, श्रुती सुतार, राजश्री पाटील, स्नेहल पाटील, रितिषा पाटील, अनिता पाटील, वैशाली पाटील, सायली पाटील, पूजा गिरी, कीर्ती पाटील, सुमती पाटील, संगिता पाटील आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
रॅलीतून पेझारीमध्ये शेकाप महिलांची ताकद
चित्रलेखा पाटील यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष तालुका महिला आघाडीच्यावतीने पेझारी नाका ते तपासणी नाक्यापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजा केणी, सचिन धुमाळ यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ‘लाल बावटे की जय’ असा जयघोष करीत हातात लाल बावटा घेत ही रॅली निघाली.