विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक

शिक्षण संस्थेला जाब विचारण्यासाठी विद्यार्थी संघटना एकवटली

| मुंबई | प्रतिनिधी |

आयआयटी मुंबईतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येने शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. शिक्षण संस्थेला जाब विचारण्यासाठी शेकाप विद्यार्थी पुरोगामी विद्यार्थी संघटनेसह अन्य संघटनांचे विद्यार्थी सोमवारी एकवटले.

साहिलने आयआयटी मुंबईच्या पवई परिसरातील वसतिगृहात आत्महत्या केली. मागील काही महिन्यांपासून प्राध्यापकांनी जातीवाचक वक्तव्य करून मानसिक त्रास दिल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत शिक्षण संस्थेला जाब विचारण्यासाठी आंदोलन केले. शेकाप विद्यार्थी पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे राज्य प्रमुख साम्या कोरडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य आंदोलनात सहभागी झाले. सुरुवातीला मेणबत्ती प्रज्वलित करून साहिलला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकाराबाबत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मागील नऊ महिन्यांत चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला. यामध्ये तिघेजण मागासवर्गीय समाजातील असल्याचे सांगत शैक्षणिक संस्थेत अशा घटना का घडतात, असा सवाल उपस्थित करण्यात आला. आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक झालेली नाही, त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी विद्यार्थी पुरोगामी संघटनेचे प्रमुख साम्या कोरडे यांनी केली.

Exit mobile version