सर्व 13 जागांवर विजय; अनंत वाघ यांचा करिष्मा
। नागोठणे । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील अनेक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध पार पडलेल्या असतानाच बिनविरोध न झालेल्या व सर्वांचे लक्ष लागलेल्या नागोठणे विभागातील कोंडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, कोंडगाव या संस्थेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 13 जागा जिंकत शेकापने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे कोंडगाव मधील शेकापचे नेते अनंत वाघ यांनी पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखविला आहे.
या निवडणुकीत सर्वसाधारण आठ जागांसाठी प्रवीण जांबेकर, हेमंत अनंत वाघ, मधुकर मालुसरे, एकनाथ राजिवले, अशोक शिर्के, अनंत वाघ, नथुराम घासे व जयंत अनंत वाघ हे शेकापचे आठ उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. तर तर या निवडणुकीत निखिल मढवी विशेष मागास प्रवर्ग, कांचन दिपक माळी व अनुराधा अनंत वाघ महिला राखीव, गोविंद हंबीर अनुसूचित जाती जमाती व देवकी धाऊ ढेबे भटक्या विमुक्त जमाती हे शेकापचे पाच उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकीत 521 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यापैकी 10 मतपत्रिका अवैध ठरल्या.
कोंडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत कोंडगाव, पळस, पिगोंडे, कडसुरे, वांगणी व वणी या ग्रामपंचायती मधील गावांतील सुमारे एक हजार शेतकरी सभासदांचा समावेश आहे. मंगळवारी (दि.8) ही निवडणूक प्रक्रिया कोंडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकारी संस्था, रोहाचे लेखा परीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी आर जे.कापडने, सहकारी एम.एम. गोंधळे, एम.जे. नाईक, ए.आर. म्हात्रे. पी.आर. मेकडे, एस.जी.पाटील व व्ही.वाय. सुर्वे यांनी चोखपणे काम केले. त्यांना सोसायटीचे सचिव वैभव पाटील यांनी सहकार्य केले.
या विजयानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन आपला विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेश मढवी, अनंत वाघ, गणपतशेठ म्हात्रे, बाळाशेठ मढवी, एकनाथ राजिवले, बबन शिंदे, निखील मढवी, प्रभाकर ठाकूर, रंजना माळी, परशुराम बैकर, मधुकर मालुसरे, शेखर जांबेकर, रंजन जांबेकर, राम गिजे, एकनाथ गोळे, अरविंद बुरुमकर, मधुकर मढवी, नितीन राजिवले, सदानंद शिंदे, दशरथ बुरुमकर, विठ्ठल बुरुमकर, गणेश धाडसे, यशवंत शिद, खुमा हंबीर, गोविंद हंबीर, रामजी हंबीर आदींसह शेकाप कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.