| नेरळ | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण पेमारे (वय 82) यांचे बुधवारी (दि.2) वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शेकापने एक सच्चा कार्यकर्ता हरपला अशी शोकभावना आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापनदिन बुधवारी रायगडात जल्लोषात साजरा झाला.त्यानंतरच लगेचच त्याच रात्री लक्ष्मण पेमारे यांनी अखेरचा निरोप घेतला. हा एक दैदुर्विलासच म्हटला पाहिजे. कर्जत तालुक्यातील दुर्गम भागाचे नेतृत्व करणारे लक्ष्मण पेमारे हे रायगड जिल्हा परिषदेचे प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून कार्यरत होते.
ज्येष्ठ नेते स्व.प्रभाकर पाटील यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पेमारे हे उपाध्यक्ष म्हणून सलग 12 वर्षे कार्यरत होते. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवून अनेक लोकोपयोगी कामे केली. हे करीत असताना त्यांनी पक्षाचा लालबावटाही कदापि ढळू दिला नाही.
अखेरच्या श्वासापर्यंत ते लालबावट्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आ.जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ.पंडित पाटील, बाळाराम पाटील, शेकाप चिटणीस ॲड.आस्वाद पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
लक्ष्मण पेमारे हे शेकापचे ज्येष्ठ नेते होते. ॲड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांच्या पिढीचे ते बिनीचे शिलेदार होते. कर्जत तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.अत्यंत निस्वार्थीपणे जनतेच्या सेवेसाठी ते कार्यरत होते. ते आम्हा सर्वांसाठी पितृतुल्यच होते, अशी शोक मग्न प्रतिक्रिया आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनीही लक्ष्मण पेमारे हे प्रभाकर पाटील यांचे विश्वासू सहकारी होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची लालबावट्याशी जोडलेली नाळ तुटली नाही. पक्षाच्या वर्धापनदिनीच त्यांचे निधन व्हावे, हा एक दैदुर्विलासच म्हटला पाहिजे. त्यांच्या आत्म्यास लाल सलाम,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
माजी आ.पंडित पाटील यांनी पेमारे यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक उत्तम संघटक, मार्गदर्शक पक्षाने गमावला आहे. त्यांचे कार्य असेच सुरु ठेवण्याचा पक्ष म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.