अलिबागमध्ये मानाच्या दंहीहंडीचा थरार

गोविंदा पथकांची थरावर थर उभारून सलामी
उत्सव पाहण्यासाठी अलोट गर्दी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये शनिवारी (दि.5) “गोविंदा रे गोपाळा” यासह अनेक मराठी, हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर नाचत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचा आनंद अबाल वृद्धांपासून बच्चे कंपनीनेदेखील मनमुरादपणे लूटला. यावेळी अलिबाग येथे शेकाप पुरस्कृत अभिमानाच्या व मानाच्या दहीहंडीच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अनेक गोविंदा पथकांनी सहभागी होऊन मानवी मनोरे उभारून सलामी दिली. तो क्षण प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दहिहंडीचा सोहळा अतिशय रंगतदार ठरल्याचे दिसून आले.

रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात शनिवारी गोपाळकाळानिमित्त दहीहंडीचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित मानाच्या दहीहंडीच्या उत्सवाची 24 वर्षाची परंपरा जपण्यात आली. हा सोहळा अलिबाग नगरपरिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनातून राबविण्यात आला. अलिबागमधील शेतकरी भवन परिसरात दुपारी अडीच वाजल्यापासून नागरिकांनी जमण्यास सुरुवात केली. हा उत्सव पाहण्यासाठी काही तासांतच अलोट गर्दी झाली. सायंकाळी 5.00 वाजल्यापासून सुरु झालेल्या या सोहळ्यामध्ये उंच थरांसाठी गोविंदा पथकांची चुरस दिसून आली. गाण्याचा ताल, आणि एकावर एक थरातून सलामी, यामुळे दहिहंडीचा उत्साह, गोविंदाचा जल्लोष द्विगुणीत झाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, कुलाबा ढोल पथकाच्या आवाजाने संपुर्ण परिसर दुमदूमून गेला होता.

दरम्यान, या दहिहंडी उत्सवाच्या सोहळ्याचा शुभारंभ पारंपारिक ढोल ताशांच्या गजरातून करण्यात आला. त्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडले. या सोहळ्याचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्यासह, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, नगराध्यक्षा अक्षया नाईक, महिला आघाडी प्रमुख तथा उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती अनिल चोपडा, महिला व बालकल्याण सभापती डॉ. साक्षी पाटील, उपसभापती ॲड. अश्वीनी ठोसर, वृषाली ठोसर, ॲड. निलम हजारे, संजना कीर, संतोष गुरव, संध्या पालवणकर, ॲड. निवेदिता वाघमारे, प्रिया वेलणकर, अजय झुंजारराव, अवधुत पाटील, नागेश कुलकर्णी, सतिश प्रधान, सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशांत नाईक मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हा दहिहंडीचा उत्सव डिजेचा ठेका, दहीहंडी सोहळ्यावर सुमधूर अशी हिंदी मराठी गाणी, विजेचा झगमगाट, शिस्तबद्ध नियोजन, फुलांनी आणि विद्यूत रोषणाईने सजवलेली आकर्षक अशी उंचावरील दहीहंडी, गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी उचलेले पाऊल, गठित केलेल्या समितीचे सभासद जबाबदारीने सांभाळत असलेले काम या सर्वच गोष्टीमुळ वेगळा आनंद देत होता. यावेळी अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरातून दहिहंडीचे छायाचित्र कैद करण्याचा प्रयत्न केला. काहींनी व्हीडीओ तर काहींनी सेल्फी काढून दहीहंडीचे चित्र टिपण्याचा आनंद घेतला.

घरबसल्या उत्सव बघण्याची संधी
शेकाप पुरस्कृत अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीचा उत्सव घरबसल्या बघण्याची संधी प्रेक्षकांनादेखील मिळाली. युट्यूबसह केबलवर थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा होती. त्यामुळे अलिबागसह वेगवेगळ्या भागातील जिल्ह्यातील नागरिकांनी, मानाची दहीहंडी घरबसल्या बघितली.
पावसात भिजत लुटला आनंद
शेकाप पुरस्कृत अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या दहीहंडीचा शुभारंभ संध्याकाळी झाला. सकाळपासून जिल्ह्यात कडक ऊन होते. त्यामुळे पाऊस कधी पडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, अलिबागच्या दहीहंडीचे उद्घाटन झाल्यावर काही क्षणातच उत्सवाला पावसाने हजेरी लावली. या पावसात भिजत अनेकांनी दहिहंडी उत्सवाचा आनंद लुटला.
सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्थापन
दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदा पथकासाठी आयोजकांनी उत्तम व्यवस्थापन केले होते. रुग्णवाहिकेसह अग्नीशमन दलाचे वाहन, वैद्यकिय यंत्रणा तैनात करण्यात आली होती. गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी तसेच अपघात टाळण्यासाठी जमीनीवर मॅटची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली होती.
Exit mobile version