माऊ इलेव्हनने पटकावला शेकाप चषक

चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

ताजपूर येथे झालेल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत थळ येथील माऊ इलेव्हन संघ शेकाप चषक 2024 चा मानकरी ठरला. या संघाला रोख 33 हजार 333 रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला.


यावेळी शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, माजी सरपंच मोहन धुमाळ, प्रदीप रसाळ, मधुकर ढेबे, अंजली ठाकूर, जयवंत तांबडकर, प्रीती तांबडकर, बाळू पाटील, उत्तम रसाळ, सुनील पाटील, महेश झावरे, गिरीष झावरे, ओमकार भोपी, अनिल झावरे आदी मान्यवरांसह श्री गणेश कला क्रीडा व शैक्षणिक मंडळाचे पदाधिकारी, सभासद, खेळाडू उपस्थित होते.

ताजपूर येथील मैदानात शुक्रवारी पाच ते रविवारी सात जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत क्रिकेटच्या स्पर्धा रंगल्या. थळ येथील माऊ इन संघ अंतिम विजेता ठरला. या संघाला प्रथम क्रमांकाचे रोख 33 हजार 333 रुपये व चषक, भोनंग येथील स्टार संघाला द्वितीय क्रमांकाचे 22 हजार 222 रुपये व चषक, तसेच ताजूपर येथील नीर इलेव्हन व श्री गणेश ताजपूर या संघाला तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे प्रत्येकी 11 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.

स्थानिक खेळाडू घडले पाहिजे - चित्रलेखा पाटील
शेतकरी कामगार पक्ष शेतकरी, कष्टकरी, गोरगरीबांशी बांधिलकी जपणारा पक्ष आहे. सामाजिक काम करीत असताना स्थानिक खेळाडू घडले पाहिजे या भूमिकेतूनही शेतकरी कामगार पक्ष काम करीत आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांची ही भूमिका कायमच राहिली आहे. ताजपूर या ठिकाणी क्रीकेटच्या स्पर्धा भरविल्या. त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. कारण गावे, वाड्यातून चांगले खेळाडू बनले पाहिजे. राज्य, देश पातळीवर त्यांना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. या पध्दतीने आपण प्रयत्न करणार आहोत, असे शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
Exit mobile version