रखडलेल्या अलिबाग-रामराज-रोहा रस्त्यासाठी शेकापचा हल्लाबोल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेकापक्षाच्या रास्ता रोका आंदोलनामुळे सुरु झालेले अलिबाग-रामराज-रोहा रस्त्याचे काम पुन्हा एकदा रखडल्याने शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. रखडलेले काम त्वरित सुरु करण्याच्या मागणीसाठी शेकापक्षाच्या महिला आघाडीप्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील आणि तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. जर तातडीने हे रखडलेले काम सुरु करण्यात आले नाही, तर शेकापक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


अलिबाग-रामराज-रोहा या अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि तत्कालिन आमदार पंडित पाटील यांनी मंजुरी मिळवून आणली. मात्र, राजकारण करीत सदर रस्त्याच्या कामाला तत्कालिन सेना-युती सरकारने सुरुवात करुन दिली नाही. शेवटी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी युवक संघटनेने रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाच्या तडाख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन मुख्य अभियंता सुखदेवे यांनी आंदोलनस्थळी येऊन दिले होते. त्यानुसार काही दिवसातच सदर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. त्यावेळी कसलाही संबंध नसलेल्या काही उपटसुंभांनी येऊन श्रेय लाटण्याचे केविलवाणे प्रयत्नदेखील केले. मात्र, पुन्हा एकदा हे काम रखडले आहे.

अतिशय वाईट अवस्था झालेल्या या रस्त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांमुळे अनेकांना प्राणदेखील गमवावे लागले, तर अनेकजण जखमीदेखील झाले. बाळंतपणासाठी या मार्गावरुन जाणार्‍या आयाबहिणींना अतोनात यातनांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आहे. त्यामुळे महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील आणि तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापक्षाच्या शिष्टमंडळाने लक्षवेधी इशारा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र, यावेळी कोणीही जबाबदार अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे शिष्टमंडळाच्या संतापाचा पारा चढला. कसलेही जबाबदार उत्तर देऊ न शकणार्‍या या कर्मचार्‍यांना शेकापच्या नेत्यांनी खडेबोल सुनावत तातडीने वरिष्ठांना कार्यालयात बोलावण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी चित्रलेखा पाटील, अनिल पाटील, सुधीर चेरकर, विक्रांत वार्डे, रमेश पाटील, जया तांबटकर, मधू ढेबे, मोहन धुमाळ, अरुण भगत यांनी सदर रस्त्याचे काम का रखडले आहे याचा जाब विचारला. यावेळी शेकापचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी कंत्राटदाराने काम थांबवले असल्याचे सांगत ते पुन्हा सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. मात्र, संतप्त शिष्टमंडळाने कागदी घोडे न नाचविता तात्काळ काम सुरुच झाले पाहिजे, असे सुनावत कंत्राटदाराला संपर्क साधण्यास सांगितले. त्यावर मोबाईलवरुन कंत्राटदार आणि अभियंता डोंगरे यांच्यात संभाषण होऊन शिष्टमंडळाला लगेच काम सुरु करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र, काम त्वरित सुरु न झाल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या कामात कोणी लोकप्रतिनिधी टक्केवारी मागून त्रास देत आहे का? किंवा इतर मार्गाने आपल्याकडूनच साहित्य विकत घेण्यासाठी वा डंपर लावण्यासाठी दबाव आणत आहेत का? याचीही विचारणा केली. जर कोणी असे प्रयत्न करीत असेल, तर तसेच स्पष्ट सांगा. त्याला चांगला धडा शिकवून शेकापक्ष संरक्षण देईल, अशी हमी यावेळी देण्यात आली. – मधू ढेबे, माजी सरपंच

शेकापक्षाच्या प्रयत्नाने सुरु झालेले काम अधिकारी आणि कंत्राटदाराच्या चालढकलपणामुळे रखडले आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्‍यांचे अतोनात हाल होत आहेत. जर रखडलेले काम तातडीने पुन्हा सुरु न केल्यास पक्षातर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल. – चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख

अलिबाग-रोहा रस्त्याचे सुरु करण्यात आलेले काम रखडण्यामागे नक्की काय कारण आहे हे पुढे येत नाही. जर बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराने सदर काम त्वरित सुरु न केल्यास त्यांना शेकापक्षाच्या स्टाईलने धडा शिकवला जाईल. – अनिल पाटील, शेकापक्ष तालुका चिटणीस

रखडलेले काम त्वरित सुरु न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना तसेच कंत्राटदाराला अद्दल घडवू. – सुधीर चेरकर, सरपंच, वरंडे ग्रामपंचायत

Exit mobile version