कोल्हापुरात उद्या संघर्ष मोर्चा; समविचारी आघाडीकडून मोर्चाचे आयोजन
| कोल्हापूर | प्रतिनिधी |
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल डावलून शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून सत्तेचे गणित बदलण्याचा प्रयत्न म्हणजे सहकारातील लोकशाहीची हत्या असल्याची टीका करत समविचारी आघाडीने सोमवारी (दि. 9) कोल्हापुरात संघर्ष मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात शेतकरी कामगार पक्ष सहभागी होणार असून, पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेकाप कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.
गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या. सभासदांनी मतदानातून आपला कौल स्पष्ट केला असतानाही राज्य सरकारने वार्षिक उलाढाल 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक असलेल्या ‘अ’ वर्ग सहकारी संस्थांवर शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार गोकुळमध्येही शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयामुळे निवडून आलेल्या संचालकांच्या अधिकारांवर गदा येत असल्याचा आक्षेप समविचारी आघाडीने घेतला आहे.
सरकारचा हा निर्णय सहकाराच्या मूळ तत्त्वांनाच हरताळ फासणारा असल्याची भूमिका शेतकरी कामगार पक्षाने घेतली आहे. निवडणुकीत बहुमताचा कौल न मिळाल्यानंतर शासनाच्या अधिकारांचा वापर करून सत्तेचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. सहकारी संस्थांमध्ये सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनाच निर्णय घेण्याचा अधिकार असताना सरकारने हस्तक्षेप करून लोकशाही प्रक्रियेत अडथळे निर्माण करू नयेत, अशी शेकापची भूमिका आहे.
गोकुळ हा केवळ दूध संघ नसून हजारो दूध उत्पादक शेतकरी, सभासद आणि त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक हिताशी जोडलेली संस्था आहे. त्यामुळे गोकुळच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप वाढवून सभासदांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही. गोकुळचे अस्तित्व, दूध उत्पादकांचे हित आणि सहकारातील लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी सभासदांनी एकजुटीने संघर्षात उतरावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
सरकारला धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
गोकुळच्या निवडणुकीत भाजपला पराभव पचवता आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून चार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आता त्यांनाही मतदानाचा अधिकार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार म्हणजे सभासदांनी दिलेला कौल डावलण्याचा प्रयत्न आहे. गोकुळच्या कारभारात लोकशाही प्रक्रियेवर गदा आणली जात आहे. गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे; तो कोणाच्या राजकीय स्वार्थासाठी वापरू दिला जाणार नाही. गोकुळचा ब्रँड वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सरकारचा हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवू, अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली आहे.
‘गोकुळ वाचवा, सहकार वाचवा! स्वाभिमानाचा एल्गार’ या घोषणेखाली सोमवारी सकाळी 10 वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, दूध उत्पादक शेतकरी, गोकुळचे सभासद, नागरिक आणि शेकाप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
जयंत पाटील,
शेकाप सरचिटणीस
