सरकारकडून चार महिन्यांची बिले थकली
| पनवेल | वार्ताहर |
गरीब आणि गरजूंना केवळ 10 रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या पनवेलमधील शिवभोजन केंद्रावर आता शासकीय अनुदानाचे संकट घोंघावू लागले आहे. मागील चार महिन्यांची बिले केंद्रांना मिळाली नसल्याने केंद्र बंद करण्याची वेळ केंद्र मालकांवर येऊन ठेपली आहे. पैसे मिळत नसल्याने केंद्र सुरू ठेवायची कशी, असा प्रश्न केंद्रप्रमुखांसमोर उभा राहिला आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2020 मध्ये शिवभोजन योजनेची घोषणा करून 1 जानेवारी 2020 मध्ये या योजनेला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली. त्यानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीत 300 थाळ्यांना मंजुरी देण्यात आली होती.
महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली ही योजना 2020 आणि 21 मध्ये जोमाने सुरु झाली. राज्यात 18 हजार गोरगरीब आणि गरजूंना याचा लाभ मिळाला होता. मात्र, राज्यात जसे सत्तांतरण झाले, तशी या योजनेला घरघर सुरू झाली, आणि ही योजना राज्यातून हळूहळू हद्दपार होऊ लागली. अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना बंद पडली आहे. कारण ही योजना चालवण्यासाठी राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान रखडू लागले आहे. अशीच काहीशी परस्थिती सध्या पनवेल महानगरपालिका हद्दीत निर्माण झाली आहे. 2020 मध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीत 300 थाळ्यांना मजुरी देण्यात आली होती, त्यानुसार तीन शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, अवघ्या काही महिन्यात या तीनपैकी एक केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर दोन केंद्र ही सुरूच राहिली. मात्र, ही केंद्रे देखील बंद पडण्याच्या स्थितीत येऊन ठेपली आहेत. कारण, या दोन्ही केंद्रांना गेली चार महिन्यांचे अनुदान मिळाले नाही. हे अनुदान जवळपास 15 लाखांच्या आसपास आहे. एवढे अनुदान थकल्यानंतर आम्ही केंद्र कसे सुरू ठेवायचे, असा प्रश्न केंद्र मालकांनी विचारला आहे.
नऊ लाखांची बिले थकली
पनवेलमध्ये सुरू असलेल्या दोन केंद्रांची लाखो रुपयांची बिले थकली आहे. त्यापैकी एका केंद्राचे चार महिन्यांचे नऊ लाखांचे बिल थकले आहे. दिवसाला 200 थाळ्या विकण्याची परवानगी या केंद्रांना आहे.
ही योजना चालते कशी
प्रतिथाळीमागे ग्राहकाकडून 10 रुपये घेतले जातात. शासनाकडून शहरी व ग्रामीणसाठी वेगवेगळे अनुदान दिले जाते. शहरासाठी प्रत्येक थाळीमागे 40, तर ग्रामीणसाठी 25 रुपये अनुदान दिले जाते. शिवभोजन केंद्रावर 10 रुपयात लाभार्थीना 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅम एक वाटी भाजी, 10 ग्रॅम वाटीभर वरण आणि 150 ग्रॅम भात दिला जात आहे. लाभार्थी दुपारचे एक वेळचे जेवण करू शकतो. दुपारी 12 ते 3 या पाच तासात शिवभोजनाचा लाभ मिळतो.
तीनपैकी दोनच केंद्र सुरू
महाविकास आघाडी सरकारच्या काळात, शिव भोजन केंद्राची घोषणा करण्यात आली होती, त्या नुसार पनवेल शहरात तीन केंद्र सुरू करण्यात आली होती. त्यापैकी एक केंद्र अनुदान वेळेवर मिळत नसल्याने बंद झाले आहे. तर अन्य दोन सुरू असलेले केंद्रदेखील थकीत अनुदान बिलाची वाट बघत आहे.