| मुंबई | प्रतिनिधी |
श्री मावळी मंडळाच्या राजस्तरीय कबड्डी स्पर्धेत आरएफ नाईक (ठाणे), शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब (धुळे), होतकरू मित्र मंडळ (ठाणे), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), श्री राम कबड्डी संघ (पालघर), शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर) या महिला संघानी उप-उपांत्य फेरा गाठली तर पुरुष गटात जय बजरंग क्रीडा मंडळ, वासिंद (ठाणे), हुतात्मा शांताराम कालवार (ठाणे),नवरत्न मंडळ (मुंबई उपनगर), श्री विठ्ठल क्रीडा मंडळ (ठाणे), जय बजरंग रोहा (रायगड), श्री हनुमान सेवा (ठाणे), विजय काल्हेर (ठाणे) या संघांनी दणदणीत विजयासह चौथ्या फेरीत प्रवेश केला.
ठाण्यात सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला गटातही जोरदार चुरस पाहायला मिळतेय. पालघरच्या श्री राम कबड्डी संघाने मुंबई उपनगरच्या नवशक्ती स्पोर्ट्स अॅपॅडमी संघाचा 37-22 असा 15 गुणांनी पराभव केला. तर धुळ्याच्या शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबने ठाण्याच्या जय भारतचा 45-15 असा फडशा पाडत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
पुरुष गटात ठाण्याच्या हुतात्मा शांताराम कालवार संघाने अलहिदा डावात ठाण्याच्या आत्माराम क्रीडा मंडळाचा अवघ्या एकाने गुणाने पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळवले. मध्यंतराला हुतात्मा शांताराम कालवारकडे 19-14 अशी 5 गुणांची आघाडी होती. मग आत्माराम क्रीडा मंडळाच्या विवेक म्हात्रेने खोलवर चढाया करीत सामना 28-28 असा बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या अलहिदा डावात हुतात्मा शांताराम कालवार संघाने आपल्या दुसर्या चढाईत दोन गुणांची कमाई केली व सामना एक गुणाने जिंकला. ठाण्याच्या श्री विठ्ठल क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या अभिनव क्रीडा मंडळाचा 42-35 असा 7 गुणांनी पराभव केला.