शिवशाही कालबाह्य होण्याच्या वाटेवर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी|

वातानुकूलित शिवशाही बसमधून प्रवासाला आता ब्रेक लागणार आहे. ही बस वर्षभरात कालबाह्य होणार आहे. त्याची हालचाल सुरु झाली आहे. या बसचे रुपांतर साध्या बसमध्ये होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीसहून अधिक आगारातून गायब होणार आहेत.

पुर्वी निम आराम आणि साध्या एसटी बसेस होत्या. एसटीतील प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा, म्हणून एसटी महामंडळाच्या ताफ्यात वातानुकूलित शिवशाही बसेसे काही वर्षापुर्वी दाखल झाल्या. अलिबागसह वेगवेगळ्या आगारातून या बस धावायला लागल्या. मुंबई, पुणेसह अलिबाग- पनवेलपर्यंत बसेसच्या फेऱ्या सोडण्यात आल्या. शिवशाहीतून आरामादायी प्रवास करण्याचा आनंद प्रवासी घेत होते. परंतु, गेल्या काही वर्षात या वातानुकूलित बस सेवांमध्ये एसी बंद असणे, चार्जिंग पॉईंट्स निकामी असणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे प्रवासी वर्गात नाराजीचे सुर उमटू लागले. वारंवार होणारी नादुरुस्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे शिवशाही बसला आता साध्या बसमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. रायगड जिल्ह्यात 31 शिवशाही बस आहेत. यापैकी तीन बस साध्या बसमध्ये रुपांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चार ते पाच लाख किलो मीटर झालेल्या शिवशाही बसला साध्या बसमध्ये रुपांतर केले जाणार आहे. जिल्ह्यातील या बसेस वर्षभरात टप्प्याटप्प्याने साध्या बसमध्ये समाविष्ट होणार आहेत. पुणे येथील कार्यशाळेत या बस पाठविल्या जाणार आहेत. त्या ठिकाणी शिवशाहीचे परिवर्तन करून लाल परी आणल्या जाणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.

Exit mobile version