विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पाठिंबा

रायगडसह राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांना सामील होण्याचे आवाहन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मुंबईतील आंदोलनानंतर शेतकरी कामगार पक्षाने एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. बुधवारी (दि.7) पुणे येथे होणाऱ्या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्यासाठी रायगड जिल्ह्यासह राज्यातील विद्यार्थी, तरुण आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.

विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मतदार यांद्यामधील घोळ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी मोर्चा आयोजित केला. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रविवारी मुंंबईत दाखल झाले. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर शेतकरी कामगार पक्षाचे लाल वादळ पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी धडकणार आहेत. पुणे येथील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुण्यात बुधवारी (दि.7), दुपारी दोन वाजता दाखल होणार आहेत. चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. रोहित पवार यांच्या विनंतीला मान देऊन असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जमणार आहेत. रायगडसह महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व तरुणांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

Exit mobile version