| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील मालाड परिसरात मंगळवारी (दि.3) रात्री भरधाव कारने दिलेल्या धडकेत 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालकानेच जखमी महिलेला रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मालाड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहंदी क्लास संपवून पायी घरी जात असताना 27 वर्षीय महिलेला कारने धडक दिली आहे. मेहंदी क्लास संपवून ती घरी परतत होती, तेवढ्यात एका आलीशान कारने तिला जोरदार धडक दिली. महिलेला धडक दिल्यानंतरही आरोपीने गाडी थांबवली नाही. त्याने महिलेला डिव्हायडरपर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि कार चालकाने महिलेला रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला गाडीखाली चिरडल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांकडून चालकाला बेदम मारहाण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरधाव वेगाने कार चालवून महिलेला उडवणारा कारचालक मर्चंट नेव्हीमध्ये सेवेला आहे. जमावाकडून मारहाण झाल्यानंतर चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. चालकाने मद्यपान केले होते किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मालाड पोलिसांनी चालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर कारचालकाने मद्यपान केले होते की, नाही ते स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.