। मुंबई । प्रतिनिधी ।
शिंदे गट जे बोलतो त्याच्या मागचा सुत्रधार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, शिंद्यासारखे आम्ही कोणाचे गुलाम नाहीत, उद्धव ठाकरेंनी आमचा स्वाभिमानाचा मार्ग ठरवला आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत मंगळवारी (दि.14) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, शिंदे गट जे बोलतो त्यांच्या मागचा सुत्रधार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. चाळीस वर्ष त्यांनी ठाकरे कुटुंबीयांचे मीठ खाल्ले आहे. जर अशा प्रकारची भाषा ते लोक करत असतील तर त्यांना नमक हरामी म्हणावे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही त्यांच्यासारखे गुलाम नाही आहोत. आमचा स्वाभिमानाचा मार्ग उद्धव ठाकरेंनी ठरवला आहे. त्या दिशेने आम्ही निघालो आहोत. हे लोक डरपोक आणि भ्रष्टाचारी आहेत. आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी घाबरून हे लोक अमित शहांचे गुलाम बनले आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.