। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहरातील एका शाळेत दहावीतील विद्यार्थिनीला प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने चांगले गुण हवे असतील तर मला खूश ठेवावे लागेल असे सांगून ‘गुण’ उधळणार्या शिक्षकाला पालकांनी चोप दिला आहे. त्या शिक्षका विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश नवेले असे शिक्षकाचे नाव आहे. संबधित शिक्षणसंस्थेने त्या शिक्षकाचे निलंबन केले आहे.
रत्नागिरीतील एका विद्यालयातील शिक्षक प्रथमेश चंद्रकांत नवेले हा वर्गातील मुलींना त्रास द्यायचा, असभ्य वर्तन करायचा व मोबाईलवर लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे मेसेज पाठवायचा. मागील काही दिवसांपासून मुलींना त्रास देत होता. अनेक मुलींची याबाबत तक्रार होती. दरम्यान, एक विद्यार्थिनी काहीशी अस्वस्थ वाटल्याने त्या मुलीच्या आईने विचारले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हे समजताच अनेक पालक याची चौकशी करण्यासाठी विद्यालयात गेले असता त्या शिक्षकाला आतील खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याला बाहेर आणा, अशी मागणी पालक करत होते. दरम्यान, काही नागरिकांनी त्या शिक्षकाला पकडून बाहेर आणले व यथेच्छ चोप दिला. त्यावेळी एक शिपाई त्या शिक्षकाच्या मदतीला धावला आणि एका नागरिकाला लाथ मारली. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले होते. याबाबत समजताच शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. तसेच, पीडित मुलींनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.