राहुल डाळिंबकरांच्या घराचे मोठे नुकसान
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील आरपीआयचे नेते राहुल डाळिंबकर यांच्या बुद्धनगर येथील घरात सोमवारी सायंकाळी स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये डाळिंबकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून, महसूल विभागाने पंचनामा केला आहे.
कर्जत शहरातील बुद्धनगर भागात राहुल डाळिंबकर राहतात. माजी नगरसेवक असलेले डाळिंबकर यांच्या घरात सोमवारी (दि. 13) आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. अनेकांना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे वाटले. मात्र, घराची पाहणी केली असता डेनिम कंपनीच्या बॉडी स्प्रेने घरात मोठा स्फोट झाला असल्याचे स्पष्ट झाले. हा स्फोट इतका मोठा होता की, घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, इलेक्ट्रिक वस्तूदेखील जळाल्या आहेत. त्याचवेळी घराच्या पहिल्या मजल्यावर असलेले सिमेंट पत्रेदेखील फुटले आहेत. त्यामुळे हा स्फोट किती मोठा होता, हे स्पष्ट होत आहे. बुद्धनगर येथील डाळिंबकर यांचे घर दाट वस्तीत आहे. ही घटना कळताच कर्जत महसूल विभाग यांनी पंचनामा करून घटनेची दखल घेतली आहे.