धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल शुक्रवारी (दि.5) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई रात्रीच्या वेळी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना थांबून त्यांची तपासणी देखील करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. अशीच नाकाबंदी पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने एका गाडीला थांबवले, गाडीची तपासणी केली. त्यावेळी ड्रायवर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आला. त्यानंतर ड्रायव्हरने महिला पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती मिळत आहे. आरोपी संजय फकिरा साळवे (रा.पिंपरी चिंचवड (मूळगाव- जालना)) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने दारू पिऊन हे धक्कादायक कृत्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version