। रेवदंडा । प्रतिनिधी ।
चौल मध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि. 20) दुपारी एकच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी शाळेतून शनिवारी (दि. 20) दुपारी एकाच्या सुमारास चौल पाण्याच्या टाकीजवळून येत होती. दरम्यान आरोपीने ओळखीचा फायदा घेत तिला जवळ बोलावलं. मोबाईलमधून अश्लील व्हिडिओ दाखवत त्याने लाजिरवाणं वर्तन करून तिचा विनयभंग केला. या विकृत प्रकारामुळे चौल परिसरात संतापाची ज्वालामुखी उसळली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घृणास्पद कृत्यासाठी संतोष उर्फ (रामा) गोविंद मगर (54), रा. चौल, वर्तक आळी शेजारी या नराधमाला रेवदंडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “मुलींच्या सुरक्षेला गालबोट लावणाऱ्या अशा नराधमाला जन्मभर कारागृहात सडवले पाहिजे,” अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. चौलमध्ये या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, परिसरातील नागरिक न्याय मिळेपर्यंत ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.
धक्कादायक! चौलमध्ये दहा वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग
