। रेवदंडा । प्रतिनिधी ।
चौल नाका येथे राहत्या घरात सुनेला एकटीच पाहून सासऱ्याने तिचा विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सदर महिला स्वयंपाकघरात काम करीत होती. तिचे पती हे मुलाला शाळेत सोडण्याकरिता घराबाहेर गेल्यावर त्या घरात एकट्याच असल्याचा गैरफायदा घेऊन 74 वर्षीय सासऱ्याने महिलेस पाठीमागून घट्ट मिठी मारून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून सदर महिलेचा विनयभंग केला. याबाबत सदर महिलेच्या पतीने वडिलांना विचारणा केली असता, त्यांनी शिवीगाळ करून सदर महिलेस व तिच्या पतीला घरातून निघून जा, अशी धमकी दिली. याबाबतची तक्रार पीडित महिलेने रेवदंडा पोलीस ठाणे येथे नोंदविली आहे.
याबाबत महिलेच्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक म्हशिलकर करीत आहेत.