| महाड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील महाड बाजारपेठ ही सर्वाधिक मोठी बाजारपेठ असली तरी योग्य नियोजनाअभावी बाजारपेठेत होणार्या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक आणि येणार्या पर्यटकांना देखील त्रास होत आहे. शहरात असलेले दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते आपला माल समोरील गटारावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होवून पादचार्यांना त्रास होतो.
शहराला सर्वात मोठी बाजारपेठ लाभली आहे. यामुळे तालुक्यासह पोलादपूर, माणगाव, मंडणगड,म्हसळा आणि गोरेगाव येथून नागरिक खरेदीसाठी येत असतात. शिवाय महाड हे ऐतिहासिक शहर असल्याने याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक, शिवप्रेमी, भीमसैनिक दाखल होत असतात. गेली अनेक वर्षा पासुन शहराचा विस्तार देखील वाढू लागल्याने लोकसंख्येत देखील वाढ झाली आहे. लोकसंख्या आणि बाजारपेठेतील गर्दी पाहता मुख्य बाजारपेठ रुंदीकरण झालेले नाही. यामुळे मुख्य बाजारपेठेत अवजड वाहन शिरताच अन्य वाहनांना अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडी होत आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण नगर रचना आणि विकास यामधील नियमात बसवला गेलेला नाही. यामुळे बाजारपेठ अरुंदच राहिली आहे. त्यातच अनेक दुकानदार आपला माल आणि विक्रीला आलेले सामान रस्त्यावर किंवा गटारच्या वर लावून ठेवत असल्याने पादचार्यांना देखील त्रासदायक ठरत आहे. महाड शहरात ही अवस्था छ.शिवाजी चौक ते भगवानदास बेकरी मार्ग, पिंपळपार ते थेट जुना पोस्ट, शहरातील अंतर्गत रस्ते या रस्त्यांवर कायम दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी चौक याठिकाणी पोलीस वाहतूक शाखेचे केंद्र तर महाड नगर पालिकेचे प्रशासकीय भवन आहे. मात्र रस्त्यातील भाजीवाल्यांचे अडथळे, दुकानांचा माल याकडे पालिका आणि पोलीस कर्मचारी डोळेझाक करत असल्याने या विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. वाहतूक आणि शहर विकासाचे नियोजन नसल्याने ही अवस्था दिसून येत आहे. एकीकडे मतदार जपण्याचे काम पुढारी करत असल्याने नकळत रस्त्यावर बेकायदेशीर विक्री करणार्या लोकांना सरंक्षण मिळत आहे.