वरिष्ठ क्लार्क सोडून सर्व पदे रिक्त
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
भारत हा जगातील सर्वात मोठा दुध उत्पादक देश आहे. श्वेत क्रांतीमुळे देशाने दुग्धक्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील दुग्ध विकास विभागात कर्मचार्यांची वानवा आहे. वरिष्ठ क्लार्क सोडून जिल्हा दुग्ध विकास अधिकार्यांपासून ते शिपाईपर्यंत अशी येथील सर्व पदे रिक्त आहेत. आणि पशुधन विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांवर अतिरिक्त कार्यभार आहे.
जिल्ह्यात समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय केला जातो. बहुतांश शेती ही ओस आहे. तसेच द्योगिककरण झाल्याने लोकांना येथे रोजगाराची संधी आहे. त्यामुळे किनारपट्टीचा भाग व एमआयडीसीचा भाग सोडून महाड, माणगाव, कर्जत, खोपोली, तळा व सुधागड आदी तालुक्यात दूध उत्पादन होते. आणि तेही अल्प प्रमाणात होते. जिल्ह्यात दररोज साधारण तीन लाख 16 हजार 247 लिटर दुधाची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात येथून साधारण एक लाख 74 हजार 698.5 दुधाचे उत्पादन होते.
प्राथमिक दुग्ध सहकारी संस्था
महाड आणि खालापूर येथे प्राथमिक दुग्ध सहकारी संस्था आहेत. त्यापैकी महाड प्राथमिक दुग्ध सहकारी संस्था चालू असून सध्या संकलन बंद आहे. खालापूर येथील प्राथमिक दुग्ध सहकारी संस्थेमध्ये काही थोड्याफार प्रमाणात दूध संकलन केले जाते.
रिक्त पदे
जिल्हा दुग्धविकास अधिकारी एक पद रिक्त असून सध्या डॉ. सुदर्शन पाडावे पशुधन विकास अधिकारी जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण यांच्याकडे याचा अतिरिक्त कार्यभार आहे. याबरोबरच सहाय्यक जिल्हा दुग्धविकास अधिकारी एक पद रिक्त, दूध संकलन अधिकारी व दूध संकलन पर्यवेक्षक अशी दोन्ही पदे रिक्त आहेत. सहाय्यक निबंधक पद, शिपाई एक पद अशी पदे रिक्त असून पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व इतर विभागातील कर्मचारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सध्या वरिष्ठ क्लार्क हे एक पद फक्त भरलेले आहे.
अतिरिक्त कामाचा भार
दुग्ध विकास विभागात कर्मचारीच नसल्याने येथील कामकाज सांभाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व इतर विभागातील कर्मचार्यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे. परिणामी या अधिकारी व कर्मचार्यांना दोन्ही विभागातील काम सांभाळावे लागते.
रायगड जिल्ह्यामध्ये असलेले औद्योगिक क्षेत्र तसेच पर्यटनावर अवलंबून असलेला रोजगार यामुळे दुधाचे व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन कमी प्रमाणात आहे. आम्ही दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 2002 पासून दुग्ध विकास विभागामार्फत वैयक्तिक लाभ वाटप बंद झाले असून पशुधन विकास विभागामार्फतच वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यामध्ये दुधाळ जनावरांचे वाटप करणे, वैरण व खाद्य उपलब्ध करून देणे आदी गोष्टी करत आहोत. पुढील कालावधीत पशुसंवर्धन विभागामध्ये दुग्धविकास विभाग समाविष्ट होणार या बाबत शासन स्तरावर कार्यवाही चालू आहे.
– डॉ. सुदर्शन पाडावे, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पेण, रायगड
जिल्हा दुग्धविकास अधिकारी, अतिरिक्त कार्यभार