पनवेल बसस्थानकात गर्दीच्या वेळेत एसटी बसेसचा तुटवडा

ठाणे आगाराची ठाणे-रेवदंडा बस पनवेल स्थानकात ठेवली थांबून

| अलिबाग | प्रतिनिधी |

कोरोनाकाळ संपल्यापासून अलिबाग, पेण, रोहा, मुरुड या भागातील विद्यार्थी, मुले, मुली, महिला, पुरुष नागरिक मोठ्या संख्येने शिक्षणासाठी व नोकरी व इतरनिमित्ताने तर काही पनवेल, नवी मुंबई, मुंबई, ठाणे याठिकाणी रोज प्रवास करत असतात, मात्र प्रवाशांची संख्या जास्त असल्याने त्याबदल्यात एसटी बसेसची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच असलेल्या बसेस देखील वेळेत येत नसल्याने प्रवाशांचे हालाला पारावर उरत नाहीत.

असाच काहीसा गंभीर प्रकार मंगळवार दि.8 रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून पनवेल बसस्थानकामध्ये अलिबाग/पेण बाजूकडे येणाऱ्या एसटी बसेसची संख्या कमी प्रमाणात असल्याने प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. साडेसहा वाजताच्या सुमारास पनवेल बसस्थानक येथे फलाट क्रमांक 1 वर आलेली ठाणे आगाराची बस (एमएच-20-बीएल-0017) हि दोन दरवाजे असलेली सदर बस ठाणे-रेवदंडा अशी जाणारी बस स्थानकात आल्यानंतर प्रवाशांनी भरली. त्यामुळे वाहक ए. डी. धिवर यांनी उभे असलेल्या प्रवाशांना उतरण्यास सांगत न उतरल्यास मी बस सोडणार नाही. तसेच काही प्रमाणात उभे असलेल्या प्रवाशांना उद्देशून सांगितले की, बसमधील सर्व प्रवाशांची तिकिटे काढल्याशिवाय बस जाणार नाही, ज्यांना घाई असेल त्यांनी दुसऱ्या बसने जावे असे सांगितले. वाहक व चालक यांनी संगनमत करून सदरील बस न सोडता अर्धा तास जाग्यावरच उभी ठेवली.

बस उभी का ठेवली? असे संतप्त प्रवाशांनी विचारले असता मला बसमधील गर्दीमध्ये तिकीटबुकिंग करता येत नसल्याचे सांगितले. या त्रासाबद्दल प्रवाशांनी वाहकाला जाब विचारला तर सारवासारव करत पनवेल कंट्रोलरकडे ड्रायव्हरने लॉगशीटवर नोंद करावयास दिले असता, कंट्रोलर हे लॉगशीट देत नाहीत, अडकवून ठेवले आहे, ते देत नाही, तुम्ही जाऊन कंट्रोलरला सांगा, लॉग शीट द्यायला, असे उद्धटपणे सांगितले. यावर प्रवाशी संतप्त झाले, प्रवाशांनी आरडाओरडा करायला सुरुवात केल्यावर चालकाने सुमारे अर्धा ते पाऊण तासाने बस चालू करत मार्गस्थ केली. मात्र, याचा वयोवृद्ध, आजारी रुग्ण, गरोदर माता, स्तनदा माता यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र हा बस मधील सर्व प्रकार एका पत्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तसेच, पत्रकार यांनी याबद्दल वाहकाला विचारणा केली असता उडवाउडवीची व थातुरमातुर उत्तरे देण्यात आली.
यामध्ये प्रवाशांना नाहक त्रास तर झालाच, शिवाय उशीर झाल्यामुळे शहरापासून दूर गावठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना पुढील एसटी बसेस मिळत नाही, यामुळे त्रासात अधिक भर पडते.

तरी या ठाणे-रेवदंडा बसचालक व वाहकावर कारवाई करावी, शिवाय अलिबाग, पेण, रोहा, मुरुड या आदी मार्गावरील बसेसच्या फेऱ्या वाढवून प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा, अशी संतप्त मागणी प्रवाशांनी केली आहे.

Exit mobile version