। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगडचे जिल्हाधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देणार असल्याने शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयात स्वच्छतेचा दिखावा दिसून आला. दुपारपासून रुग्णालयातील कर्मचारी जिल्हाधिकार्यांच्या स्वागताला लागले होते. रुग्णालयात दुपारनंतर सुरु असलेल्या साफसफाईबाबत रुग्णांच्या नातेवाईकांसह रुग्णांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यात कर्मचारीदेखील त्यांच्या गणवेशात असल्याचे दिसून आले.
जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता राखण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. साफसफाईपासून रुग्णालय व त्याचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम स्वच्छता कर्मचारी करतात. दुपारी साडेतीनंतर साफसफाई करताना हे कर्मचारी कधीच दिसून येत नाही. रुग्णालयात अनेक वेळा वावरताना नाक दाबून राहण्याची वेळ कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर येते. परंतु, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला भेट देणार होते. त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत असलेल्या कर्मचार्यांना थांबवून त्यांच्याकडून जिल्हाधिकारी येईपर्यंत स्वच्छता करण्यास सांगण्यात आले. स्वच्छतागृहापासून रुग्णालयातील परिसर साफ करण्याची लगबग रुग्णालयात दिसून आली. तसेच रुग्णालयातील गणवेशाविना कर्तव्य बजावणारे कर्मचारी आज गणवेशात दिसून आले. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना आश्चर्याचा धक्काच बसला. दरम्यान, जिल्हाधिकारी जावळे यांनी सायंकाळी चारनंतर रुग्णालयात प्रवेश केला. रुग्णालयातील इमारतीची पाहणी केली. डायलेसिस सेंटरच्या नूतनीकरणाचे काम पाहिले. त्यानंतर वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन तेथील अडचणी जाणून घेतल्या. इमारतीचे कामकाज तातडीने करण्याबरोबरच त्यासाठी लागणार्या निधीबाबतही सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत त्यांनी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







