। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन नगरपरिषद लवकरच स्मार्ट नगरपरिषद होण्याच्या मार्गावर आहे. नुकताच श्रीवर्धन शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या प्रक्षेपणाचा लोकार्पण सोहळा पार पडला. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पालघर ते गोवा या 752 किलोमीटर लांबीच्या अंतरामध्ये फक्त श्रीवर्धन समुद्रकिनारी धुप प्रतिबंधक सुशोभीकरण केलेला बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधार्यावरती मच्छिमार बांधव, होडी, त्याचप्रमाणे खेकडा व कोळंबी यांच्या प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत.
तसेच, सेल्फी पॉईंटदेखील बनविण्यात आले आहेत. धूप प्रतिबंधक बंधार्यावरती विद्युतरोषणाई केलेली असून, बसण्यासाठी सुशोभित अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक शोभेची झाडेदेखील लावण्यात आलेली आहेत. श्रीवर्धन समुद्रकिनार्यासह संपूर्ण श्रीवर्धन शहर सीसीटीव्ही कक्षेच्या प्रक्षेपणात जोडले गेले आहे. या सीसीटीव्हीचा डिस्प्ले श्रीवर्धन नगरपरिषद व श्रीवर्धन पोलीस ठाणे या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेला स्वच्छता अभियानात व माझी वसुंधरा अभियानात अनेक बक्षिसे प्राप्त झालेली असून, श्रीवर्धन शहर नेहमीच स्वच्छ असल्याचे पाहायला मिळते.
श्रीवर्धन समुद्रकिनारा देखील स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल असून, या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी स्वच्छता कर्मचार्यांसह एक यांत्रिक गाडी देखील कचरा उचलण्याचे काम करत असते. श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरती पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षकांची नेमणूक देखील नगरपरिषदेतर्फे करण्यात आलेली आहे. श्रीवर्धन शहरातील कचरा उचलण्यासाठी नगर परिषदेच्या घंटागाड्या सकाळ, संध्याकाळ श्रीवर्धन शहरामध्ये घरोघरी फिरून कचरा उचलण्याचे काम करत असतात. त्यामुळे श्रीवर्धन शहर हे नेहमीच स्वच्छ असल्याचे व सुंदर दिसत असल्याचे येणार्या पर्यटकांना व नागरिकांनादेखील जाणवते.
दर शनिवारी व रविवारी सायंकाळी श्रीवर्धन समुद्रकिनारी हिंदी व मराठी गाण्यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येत असतो. श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीमध्ये सांडपाण्याची व्यवस्थादेखील उत्तम प्रकारे करण्यात आलेली असून, रस्त्यावर किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी सांडपाणी साचलेले आढळून येत नाही. शहरामध्ये नारळ, सुपारीच्या वाड्या असल्यामुळे डासांचे प्रमाण थोड्या अधिक प्रमाणात असते. परंतु, नगरपरिषदेकडून ते कमी करण्यासाठी कीटकनाशक फवारणी नियमित प्रमाणे करण्यात येते. श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणार्या सर्व जलवाहिन्या मागीलवर्षी नवीन टाकण्यात आलेल्या आहेत. तसेच, जलशुद्धीकरण प्रकल्प देखील कार्यान्वित करण्यात आलेला आहे. श्रीवर्धन शहरात येणार्या पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे.
श्रीवर्धन शहरातून उचलण्यात येणार्या कचर्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. भविष्यात श्रीवर्धन या ठिकाणी तारांगणदेखील उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, श्रीवर्धन बाजारपेठ येथे असलेल्या जुनी तहसील कार्यालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी मोठा अश्वारुढ शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व सोयीं-सुविधांमुळे लवकरच श्रीवर्धन शहर हे स्मार्ट नगरपरिषद म्हणून अस्तित्वात येईल. यामध्ये कोणतीही शंका नाही.