| पुणे | प्रतिनिधी |
कौटुंबिक वादातून झालेल्या झटापटीत तरुणाचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. याप्रकरणी चुलतभावाला नांदेड सिटी पोलिासंनी अटक केली. अमर देशमुख (35), रा. धायरी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलतभाऊ राजू देशमुख रा. धायरी याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मोहपत साहारे (36), रा. धायरी यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू आणि त्याचा चुलतभाऊ अमर मूळचे मध्य प्रदेशातील आहे. दोघे जण एका खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी (दि.14) रात्री साडेआठच्या सुमारास राजू आणि अमर यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले. पत्नीबद्दल अपशब्द उच्चारल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अमर हा चुलतभाऊ राजूच्या अंगावर धावून गेला. झटापटीत राजूने अमरला धक्का दिला. सदनिकेच्या बाल्कनीतून अमर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रहिवाशांनी जखमी अवस्थेतील अमरला खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या अमरचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी राजूची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत त्याने वादातून बाल्कनीत थांबलेल्या चुलतभाऊ अमरला धक्का दिल्याने तो बाल्कनीतून पडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. चुलतभावाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी राजूला अटक करण्यात आली. या घटनेचा पोलीस मोरे अधिक तपास करीत आहेत.