श्रीवर्धन पोलिसांची चोरट्यांवर नजर

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहरात गेल्या महिन्यात विठ्ठल आळी व पोद्दार चाळीत चोरट्यांनी दरवाजांचा कडी कोयंडा तोडीत हात साफ केला होता. दोन ठिकाणी चोऱ्या झाल्यानंतर नागरिकांना सायंकाळी व रात्री चोरटे फिरत असल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी आपापल्या परिसरात रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी रात्री अपरात्री चोरट्यांचा पाठलाग केला असता ते डोंगरावर पळून जात असल्याचे सांगितले होते. श्रीवर्धन पोलीस व नागरिकांच्या चर्चेवेळी, चोरांचे वास्तव्य अथवा चोरटे सायंकाळ दरम्यान डोंगर मार्गाने खाली उतरत असल्याचा अंदाज काढण्यात आला होता. श्रीवर्धन पोलिसांकडून आता सायंकाळ, रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे डोंगरावर निगराणी ठेवण्यास सुरुवात झाली आहे. जीवनाबंदर डोंगर पट्टयात काही संशयास्पद हालचाली आढळल्या नसल्याचे श्रीवर्धन पोलिसांकडून सांगण्यात आले. नागरिकांनी आता अफवांवर विश्वास ठेवू नये. संशय आल्यास पोलीसांना कळवा, संशयित व्यक्ती डोंगर पट्टयात पळून गेली असल्यास ड्रोनने पाहणी करता येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version