| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विस्फोट आणि उन्हाळ्यात होणारी पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी यामुळे श्रीवर्धन शहराची तहान भागवणारे रानवली धरण आता पुरते दमले आहे. सुमारे 35 ते 40 वर्षे जुन्या झालेल्या या एकाच धरणावर सध्या संपूर्ण शहराचा भार आहे. त्यातच रोज फुटणारी मुख्य पाईपलाईन आणि धरणाची वयोमर्यादा यामुळे श्रीवर्धनच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यामुळे श्रीवर्धन हे पर्यटकांचे आवडते केंद्र बनले आहे. मात्र, या वाढत्या पर्यटनाचा थेट आणि प्रचंड ताण शहराच्या पाणीपुरवठ्यावर पडत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येथील हॉटेल्स, होमस्टे आणि रिसॉर्ट्स पर्यटकांनी हाऊसफुल्ल असतात, ज्यामुळे पाण्याची दैनंदिन मागणी अचानक दुप्पट-तिप्पट होते. दुसरीकडे, शहरात वेगाने वाढणारे गृहप्रकल्प आणि वाढती स्थानिक लोकसंख्या यामुळे मे आणि जून महिन्यांत रानवली धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावतो. सद्यस्थितीत शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या नगरपरिषद आणि संबंधित जलसंपदा विभागाकडून केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या केल्या जात आहेत. रोज पाईपलाईन फुटली की ती जोडणे, एवढ्यापुरतेच प्रशासनाचे काम मर्यादित राहिले आहे. श्रीवर्धनच्या भौगोलिक रचनेचा सखोल अभ्यास करून नवीन धरण किंवा मोठा जलसाठा उभारण्यासाठी ठोस व दूरगामी पावले अद्याप उचलली गेलेली नाहीत. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आगामी काळात श्रीवर्धनमध्ये पाण्याचे भीषण युद्ध सुरू होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.







