सिंधुदुर्ग संघाचा 36 वा वर्धापनदिन सोहळा संपन्न

| पनवेल | वार्ताहर |

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल या संस्थेचा 36 वा वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने नवीन पनवेल येथील संघाच्या कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. श्री. रमेश व सौ. रुपाली गवस यांनी पूजेचे यजमानपद भूषविले.

सायंकाळी डॉ. भगवान बिरमोळे, नगरसेवक जयवंत पगडे, एसीपी विनोद चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सिंधुदुर्ग सांस्कृतिक कला अकॅडमी निर्मित भक्तिगीतांचा कार्यक्रम हे सोहळ्याचे आकर्षण ठरले. प्रसिद्ध गायक प्रसन्नकुमार घागरे व त्यांच्या शिष्यांनी अभंग, भजन, मराठी, हिंदी भक्तिगीते आदी विविध गीतप्रकार सादर करून रसिकांची प्रशंसा प्राप्त केली. गायक कलाकारांना प्रदिप रावले यांनी संवादिनी, अनिल नेमळेकर व रंगनाथ नेरुरकर यांनी तबला, आणि संकेत पवार व रवींद्र खोबरेकर यांनी पखवाजसाथ केली. वैभवी मराळ यानी कार्यक्रमाचे निवेदन केले.

संघाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रिया खोबरेकर, सचीव बाप्पा मोचेमाडकर, दिपक तावडे, मनोहर मराळ, बाबाजी नेरुरकर, अशोक चव्हाण, अंकिता पालव, सुरेखा पवार यांच्यासह कार्यकारिणी सदस्यानी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. प्रदीप रावले, हरिश्चंद्र पालव, प्रभाकर येरम व सहकारी यांच्या सुस्वर भजनाने सोहळ्याची सांगता झाली.

Exit mobile version