44 जणांना जून ते सप्टेंबर या महिन्याचे वेतन मिळाले नसल्याची माहिती
। अलिबाग । प्रमोद जाधव |
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आरसीएफ संचलित शाळेतील 44 शिक्षक, शिक्षकेत्तर गेल्या चार महिन्यांपासून वेतनाविना काम करीत आहेत. त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सुमारे पाच कोटीहून अधिक रुपयांचे वेतन थकले असल्याची माहिती समोर येत आहे.
आरसीएफ शाळा गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवर्यात सापडत आहे. शाळा बंद ठेवण्याच्या भुमिकेबाबत पालक वर्गात संतापाची लाट उसळत असताना गेल्या चार महिन्यांपासून आरसीएफ शाळेतील शिक्षकांना वेतनच मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. थळ येथील खत निर्मिती करणार्या आरसीएफ प्रकल्पाच्या स्थापनेनंतर कुरुळ येथे आरसीएफ संचलित डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत शाळा सुरु करण्यात आली. या शाळेत सुरुवातीला आरसीएफ कर्मचार्यांची मुले शिक्षण घेत होते. हळूहळू या शाळांमध्ये आरसीएफसह शहरी व ग्रामीण भागातील मुलेदेखील शिक्षण घेण्यास येऊ लागले. शाळेतील शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने या शाळेला पालकांसह विद्यार्थ्यांकडून पसंती दर्शविण्यात आली. आरसीएफच्या शाळेत सीनिअर केजीपासून 12 वीपर्यंत शिक्षण मिळत आहेत. या शाळेत सीनिअर केजी पासून चौथीपर्यंत 321 विद्यार्थी व पाचवीपासून बारावीपर्यंतचे 596 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये प्राथमिक विभागाचे शिक्षकांसह 13 कर्मचारी आहेत. त्यात तीन कंत्राटी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. तसेच माध्यमिक विभागाच्या शिक्षकांसह 36 कर्मचार्यांचा समावेश असून कंत्राटी 12 शिक्षक आहेत.
यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील नियमित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण 44 जणांना जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत वेतन मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. आरसीएफ व्यवस्थापनाकडून वेतन मिळण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप शिक्षकांकडून होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांवर मोेठे आर्थिक संकट कोसळले आहे. महिन्यातील घर खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. सुमारे पाच कोटी रुपयांचे वेतन येणे शिल्लक असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
शाळेत सीनिअर केजी पासून चौथीपर्यंत 321 विद्यार्थी व पाचवीपासून बारावीपर्यंतचे 596 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये प्राथमिक विभागाचे शिक्षकांसह 13 कर्मचारी आहेत. त्यात तीन कंत्राटी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. तसेच माध्यमिक विभागाच्या शिक्षकांसह 36 कर्मचार्यांचा समावेश असून कंत्राटी 12 शिक्षक आहेत. यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील नियमित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण 44 जणांना जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत वेतन मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे.