घराच्या दुरुस्तीला विरोध; खंडाळा ग्रामपंचायतीतील प्रकार पोलीस ठाण्यात
|अलिबाग |प्रतिनिधी |
“माझा भाऊ सरपंच आहे,” असे सांगत मारहाण, शिवीगाळ आणि धमकावल्याचा आरोप करत अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील वासंती वसंत थळे आणि खंडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नचिकेत कावजी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घराच्या दुरुस्तीच्या कामास विरोध केल्याचा आरोप करत गावातील विजय थळे आणि रोहिदास थळे या भावांनी ही तक्रार दिली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, खंडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नचिकेत मधुकर कावजी आणि त्यांची बहीण वासंती थळे यांनी घर बांधकामास विरोध करत अडवणूक केली. तसेच शिवीगाळ करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घराचे दोन मजले झाल्यानंतर २० एप्रिल रोजी सरपंच नचिकेत कावजी आणि वासंती थळे हे सुरू असलेले काम थांबवण्यासाठी आले. त्यावेळी वासंती थळे यांनी सोबत आणलेला कोयता उगारत, “घर बांधकाम थांबवले नाही तर तुमचे तुकडे करून टाकीन,” अशी धमकी दिली आणि तक्रारदारांवर धावून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घर बांधण्यासाठी आलेल्या कामगारांनाही शिवीगाळ करून दगडफेक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर तातडीने अलिबाग पोलीस ठाण्यात सरपंच नचिकेत कावजी आणि वासंती थळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, पोलीस ठाण्यातही त्यांना अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच २२ एप्रिल रोजी सरपंच नचिकेत कावजी यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि वासंती थळे यांना घरी पाठवून पुन्हा शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतःच्या घराचे पत्रे फोडून नुकसान केल्याचे भासवून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सरपंच नचिकेत कावजी यांच्या विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी आणि गुन्हे दाखल असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. “सरपंचाचा भाऊ असल्याचा धाक दाखवत वासंती थळे गावात दादागिरी करतात,” असा आरोप विजय थळे आणि रोहिदास थळे यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडेही करण्यात आली असून अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.







