| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या काही दिवसांत चोरी, अपघात आणि निष्काळजीपणाच्या घटनांची मालिका उघडकीस आली आहे. या सर्व घटनांमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच फेब्रुवारी ते मार्चपर्यंत सहा गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालमधून समोर आली आहे.
विमानतळासारख्या अत्यंत संवेदनशील प्रकल्प परिसरात अल्पावधीतच विविध स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याने हा भाग ‘हाय रिस्क झोन’ बनत असल्याची भीती व्यक्त होत आहे. चोरी, अपघात, अंतर्गत गैरप्रकार आणि वाहतूक अडथळे या घटनांची मालिका प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. विमानतळ परिसरातील वाढती वर्दळ आणि सुरक्षा गरज लक्षात घेता स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्याअनुषंगाने या विमानतळ पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. मात्र, ठाणे कार्यान्वित झाल्यानंतरही गुन्ह्यांची मालिका सुरूच असल्याने सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. उलवे ते पनवेल चिंचपाडा दरम्यानच्या एअरपोर्ट लिंक रोडवरवरील अपघात, विमानतळ परिसरातील चिंचपाडारेतीबंदर सर्व्हिस रोडवर उभी केलेली सुझुकी ॲक्सेस स्कुटी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना, विमानतळावरील जी-12 रॅम्प ऑफिसमधून इंडिगो एअरलाईन्समधील कर्मचाऱ्यांचे सुमारे 1.29 लाख रुपये किंमतीच्या मोबाईलची आणि सीसीटीव्ही डीव्हीआरमशीनची चोरी, विमानतळ टर्मिनल परिसरात इलेक्ट्रिकल कामासाठी ठेवण्यात आलेल्या कॉपर वायर बंडलची खासगी सुरक्षा रक्षकाकडून चोरी, रेतीबंदर परिसरात सार्वजनिक रस्त्यावर टेम्पो आणि ट्रक उभा करून वाहतुकीस अडथळा आणण्याचा प्रयत्न, अशा गुन्ह्यांची नोंद आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भविष्यातील महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रकल्प आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘विकासाचा मार्ग’ म्हणून ओळखला जाणारा हा परिसर भविष्यात दुर्घटनांचा केंद्रबिंदू ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद
