मानखुर्दमध्ये घर कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात रविवारी (दि. 5) रात्री साडे आठ वाजता अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेतील बाधितांना गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 5) रात्री साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास मानखुर्द मध्ये हनुमान मंदिराजवळील, जनता नगर मधील चाळ क्रमांक 5 मधील तळमजला अधिक तीन मजले असलेल्या 2 ते 3 झोपड्या / कच्ची घरे कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली रहिवासी अडकले. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल एक महिला, ३ लहान मुली आणि एक लहान मुलगा अशा पाचही जणांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तसेच, राजावाडी रुग्णालयात एक लहान मुलगा मृतावस्थेत आणण्यात आला आणि एक तरुण जखमी अवस्थेत दाखल झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version