सहा वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

सुकापूर येथील दुर्घटना

| पनवेल | प्रतिनिधी |

सुकापूर येथे बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून समर्थ रवींद्र सर्जे (6) या बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी फ्युचर होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकापूर येथील शांती निकेतन सोसायटीसमोर पुनर्विकासाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. दुपारी तीन ते साडेचारच्या दरम्यान समर्थ या पाण्यात बुडाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने तसेच निष्काळजीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version